बोलेरोसह साडेसातशे लिटर हातभट्टी दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाची कारवाई
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास बोलेरो वाहनासह 630 लिटर हातभट्टी दारु जप्त केली असून इतर दोन ठिकाणी दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, उत्सव कालावधीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार अकलूज-माळशिरस रोडवर नऊचारी येथे सापळा लावून बोलेरो वाहन क्रमांक MH10 E 7235 या वाहनाची तपासणी केली असता त्यात हातभट्टी दारूने भरलेल्या नऊ रबरी ट्यूब मधून 630 लिटर हातभट्टीची दारुची अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहनचालक राकेश सुभाष पवार, वय 23 वर्षे, राहणार वडजी तांडा (ता.दक्षिण सोलापूर) या इसमास जागीच अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून बत्तीस हजार चारशे रुपये किमतीची सहाशे तीस लिटर हातभट्टी दारू, वाहन, मोबाईल असा एकूण दोन लाख बेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पथकाने माळशिरस शहराच्या हद्दीतील माळशिरस- मेडद रोडवरील शालन महादेव वाघमोडे, वय 56 वर्षे या महिलेच्या राहत्या घरातून 35 लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमधील सत्तर लिटर हातभट्टी दारुसह चार हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अशोक मारुती खांडेकर, वय 33 वर्षे, राहणार सदाशिवनगर (ता माळशिरस) याच्या ताब्यातून 55 लिटर हातभट्टी दारुसह तीन हजार तीनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरीक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.