देशातील वृत्तपत्र व नियतकालिक नोंदणी कायद्याच्या बदलानंतर
वृत्तपत्र व नियतकालिक नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल
एकाच 1000 रूपयाच्या सशुल्क अर्जात होणार शिर्षक मंजूरी आणि नोंदणी
नवी दिल्ली : मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रेस आणि नियतकालिक नोंदणी कायदा 2023 (पीआरपी कायदा 2023) केंद्र शासनाने मंजूर करून घेतला व देशातील वृत्तपत्र नोंदणी क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले आहे. जुन्या पीआरबी कायदा 1867 नुसार वृत्तपत्र - नियतकालिक नोंदणीच्या प्रक्रियेत दोन-चरणांचा समावेश होता शीर्षक पडताळणी आणि शीर्षक नोंदणीची प्रक्रिया. मात्र, नवीन कायद्यात आणि नव्याने दि. 04 मार्च 2024 रोजी ईसेवा पोर्टलवर निगर्मित करण्यात आलेल्या परिपत्रकात शीर्षक मंजूरी आणि नोंदणीसाठीची प्रक्रिया एकाच अर्जात करण्याची तरतूद आहे आणि यापुर्वी मोफत असलेल्या या सेवेसाठी आता भारतकोश पेमेंटद्वारे रू. 1000/- चा भरणा करावा लागणार आहे.
सदर अर्जाबाबत त्याचा एक संकेतांक देण्यात येईल व त्या संकेतांकावरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबत आणखी खूप बदल या नव्या परिपत्रकात करण्यात आले असून याची नोंद वृत्तपत्र व नियतकालिकांच्या प्रकाशकांनी घेणे गरजेचे आहे.
वृत्तपत्र - नियतकालिकांच्या नोंदणीसाठी सर्व अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने केले जातील. यासाठी नवीन प्रेस सेवा पोर्टल (presssewa.prgi.gov.in) तयार करण्यात आले आहे तसेच प्रेस सेवा पोर्टलसोबत सर्व संबंधित माहिती आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेससह (prgi.gov.in) ही नवीन वेबसाइट तयार करण्यात आली आहे.