भारताचे जी 20 अध्यक्षपद हे देशाच्या अंतराळातील वाढत्या वैभवाशी सुसंगत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केले.
“जी 20 शिखर परिषद अशा वेळी भारतात होत आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोच्च नेते म्हणून उदयास आले आहेत. ही शिखर परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा ध्वज फडकत आहे, पहिल्यांदाच एखादे अंतराळयान चंद्राच्या दूरवरच्या बाजूला उतरले आहे , विज्ञान आणि तंत्रज्ञानातील देशाचे यश तसेच संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक लस निर्मितीच्या यशोगाथेचे जगभरातून कौतुक केले जात आहे,” असे डॉ. सिंग म्हणाले.
नवी दिल्लीतील जी 20 शिखर परिषदेची मुख्य संकल्पना असलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेनुसार, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या पंतप्रधान मोदींच्या मंत्राला आज जगाने मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले.
भारत एकापेक्षा अधिक मार्गांनी जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे, असे डॉ जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्लीतील जी 20 शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अंतराळ क्षेत्रासह भविष्यातील कोणत्याही वैज्ञानिक प्रयत्नांसाठी, जगातील सर्व भागधारक राष्ट्रांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
***